संपादकीय

शिरूर ग्रामीण व अण्णापूर ला स्वतंत्र वीज फिडर होणार ?

अधीक्षक अभियंता बारामती यांनी स्थळपाहणी व अहवाल सादर करण्याचे दिले आदेश

0 0 8 2 3 4

*शिरूर ग्रामीण व अण्णापूरसाठी स्वतंत्र वीज फिडरचा प्रस्ताव : महावितरणकडून तांत्रिक पाहणीचे आदेश*
———–

शिरूर ग्रामीण व पंचक्रोशीतील गावांच्या वाढत्या लोकसंख्येसह पाणीपुरवठा यंत्रणा व इतर प्रश्न उद्भवू लागल्याने, गावठाण फिडरचे विभाजन करण्यासाठी शिरूर ग्रामीण व इतर गावांचे आजी – माजी गाव पुढारी, सामाजिक कार्यकर्ते सरसावलेले आहेत. त्यात माजी आदर्श सरपंच अरुण घावटे, माजी सभापती शशिकांत दसगुडे व पंच क्रोशीतील इतर अनेकजण झटत आहेत.
शिरूर ग्रामीण ग्रा पं ने या विशयीचा पत्रव्यवहार केडगाव येथील कार्यकारी अभियंता कार्यालय तसेच त्यांचे बारामती येथील वरिष्ठ अधीक्षक अभियंता कार्यालयास, तसेच मौजे अण्णापूर येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज व सामाजिक कार्यकर्ते संजय पाचंगे यांना पत्र दिलेली होती. या दोन्ही सामाजिक कार्यकर्त्यांनी महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयांशी तसा पत्रव्यावहार केला होता.
त्याच बरोबर शिरूर – हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर (आबा) कटके, शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, शिरूर पं स चे गटविकास अधिकारी महेश डोके आदींनाही याविषयाची पत्रे, शिरूर ग्रामीण ग्रा पं च्या सरपंच कु. शिल्पा गायकवाड, ऊपसरपंच संजय शिंदे यांच्या सहीने ०४/०९/२०२६ रोजी दिलेली होती.
या सर्वांच्या पाठपुराव्यामुळे शिरूर तालुक्यातील मौजे शिरूर ग्रामीण व मौजे अण्णापूर या गावांसाठी स्वतंत्र वीज फिडर तयार करण्याबाबत महावितरणने कार्यवाही सुरू केली आहे. सध्या ही गावे गाडवाण फिडरला जोडलेली असून, या फिडरवर बिघाड झाल्यास मोठ्या परिसरातील वीजपुरवठा खंडित होण्यासोबतच पाणीपुरवठा यंत्रणेवरही त्याचा परिणाम होत असल्याचे महावितरणच्या पत्रातून स्पष्ट झाले आहे.
महावितरणच्या बारामती ग्रामीण मंडळाचे अधीक्षक अभियंता दीपक लहामगे यांनी ५ ऑक्टोबर २०२६ रोजी केडगाव विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना याबाबत पत्र पाठविले आहे.

पत्रानुसार, मौजे शिरूर येथील महावितरणच्या गावठाण फिडरला ग्रामपंचायत शिरूर ग्रामीणची वीज जोडणी आहे. शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात सुमारे ६० हजार लोकसंख्या असल्याने गावाचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. ग्रामपंचायतीला पाणीपुरवठ्यासाठी गावाच्या विविध भागांत वीजपुरवठा अखंडित असणे आवश्यक आहे.
सध्या गाडवाण फिडरला गोलेगाव, तर्डोबाचीवाडी, अण्णापूर व शिरूर ग्रामीण आदी भाग जोडलेले आहेत. त्यामुळे या फिडरच्या कोणत्याही भागात बिघाड झाल्यास संपूर्ण फिडरचा वीजपुरवठा बंद होण्याची शक्यता असते. परिणामी शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीचा पाणी फिल्टर प्लांट बंद पडून नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
ही समस्या टाळण्यासाठी गाडवाण फिडरचे दोन भाग करून शिरूर ग्रामीण व अण्णापूर या गावांसाठी स्वतंत्र फिडर तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे. स्वतंत्र फिडर झाल्यास फिडरवर येणारा अतिरिक्त ताण कमी होऊन शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीचा पाणी फिल्टर प्लांट व्यवस्थित सुरू ठेवण्यास मदत होईल, तसेच नागरिकांची गैरसोय टाळता येईल, असे पत्रात नमूद केलेले होते.

दरम्यान, गावठाण फिडरची तांत्रिकदृष्ट्या पाहणी करून फिडरचे विभाजन करणे शक्य आहे का ? याची तपासणी करावी, त्यानंतर शिरूर ग्रामीण व अण्णापूरसाठी स्वतंत्र फिडरमध्ये समावेश करण्याबाबत महावितरणच्या नियमानुसार योग्य ती कार्यवाही करून त्याचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश अधीक्षक अभियंत्यांनी दिले आहेत.

त्यामुळे शिरूर ग्रामीण व अण्णापूर परिसरातील वीजपुरवठा अधिक सुरळीत होण्याची शक्यता निर्माण झाली असून, महावितरणच्या पुढील कार्यवाहीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

5/5 - (1 vote)

खुडेज टुडेज न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 8 2 3 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे