भूमिपुत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत कुटे यांच्या आंदोलनाला यश
शिरूर व पंचक्रोशीचे भारनियमन होणार कमी

- *भूमिपुत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत कुटे यांच्या MSEB विरुद्धच्या आंदोलनास यश : भारनीयमन थांबवण्याचे आश्वासन*
————-
शिरूर : दि. 17/04/2026.
बातमी : रवींद्र खुडे, संपादक
9422 650 735..
————-
शिरूर शहर व परिसरातील वाढत्या भारनियमनाकडे लक्ष वेधण्यासाठी, भूमिपुत्र प्रतिष्ठानच्या वतीने शिरूर महावितरण कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. भर कडाक्याच्या उन्हाळ्यात शहर व परिसरामध्ये अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित होत असल्याने, याचा नागरिकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात मागील महिन्यात महावितरणला निवेदन देऊन, शहर व परिसरामध्ये होत असलेल्या भारनीयमनाबाबत भूमिपुत्र प्रतिष्ठानने सर्वेक्षण केले होते. त्यात एका दिवसात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण हे किमान ४ ते ५ वेळा होते. तसेच अर्धा तास ते ५ तासापर्यंत वीजपुरवठा खंडित होत असल्याचे निदर्शनास आलेले होते. यावेळी कुठलिही नैसर्गिक आपत्ती नसताना देखील वीजपुरवठा खंडित होत होता. याचे कारण शोधले असता, शहर व परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता, एवढ्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येला सध्याचे रोहित्रे अपुरे पडत असल्याचे दिसले. त्यामुळे त्यावरच अतिरिक्त भार दिला जात होता. त्यामुळे, भारनियमनाचे प्रमुख हेच कारण असल्याचे निदर्शनास आणून देत, तसे निवेदनात स्पष्ट सांगण्यात आले होते.
मात्र निवेदन देऊनही बरेच दिवस या गंभीर समस्येवर उपाययोजना करण्यात महावितरण कार्यालय सपशेल अपयशी ठरल्याने, याच्या निषेधार्थ 17 एप्रिल 2026 पासून महावितरण कार्यालयाबाहेर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले.
या आंदोलनादरम्यान शिरूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक रवींद्र ढोबळे, भाजपचे नगरसेवक सागर नरवडे, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष किरण बनकर, रिपब्लिक पार्टीचे अध्यक्ष निलेश जाधव, माजी नगरसेवक मंगेश खांडरे, युवा सेनेचे शहराध्यक्ष स्वप्नील रेड्डी, शिक्षण मंडळाचे माजी सभापती संतोष शितोळे, भीम छावा संघटनेचे चेतन साठे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद कालेवार, मनसे महिला आघाडीच्या डॉ. वैशाली साखरे, प्रशांत शिंदे आदींनी पाठिंबा दिला. तर आंदोलनात बंडू दुधाणे, विनोद साठे, संतोष बोराडे, युवराज दुधाणे आदींनी सहभाग घेतला.
या आंदोलनाची पहिल्याच दिवशी दखल घेत शिरूर कार्यालयाचे ऊप कार्यकारी अभियंता शरद माने, सहाय्यक अभियंता वैभव बारवकर यांनी आंदोलनकर्त्यास लेखी आश्वासनाचे पत्र देत आंदोलन थांबविले. या पत्रात म्हटले आहे की, “आपले आंदोलन व मागण्यांची महावितरणने गांभीर्याने दखल घेतली असून, शिरूर शहरासह पंचक्रोशीत 528 विद्युत रोहीत्र असून त्यावर जास्त भार येत असल्याने, आणखी 13 नवीन रोहित्रांची मागणी महावितरण कंपनीकडे केलेली असून, त्याचे पूर्ण काम होण्यास 3-6 महिन्यांचा कालावधी लागेल. तरी सध्या वरिष्ठ कार्यालयाकडून जास्तीत जास्त मेंटेनन्सचे काम करून घेऊन ब्रेक डाउन टाळण्यात येईल. विजचोरीवर आळा घालण्यासाठी भरारी पथक, स्थानिक विजचोरी पथक याद्वारे विजचोऱ्या पकडून, कंपनी किंवा महावितरण संलग्न कुणीही व्यक्ती यात आढळल्यास कंपनी नियमाप्रमाणे अशा व्यक्तींवर कारवाई करेल. तरी आपण सुरु केलेले बेमुदत ठिय्या आंदोलन थांबवावे ही विनंती.”
“तसेच *9167777791* या whats app नंबरवर ग्राहकांसाठी अनेक सेवा असून त्याचा लाभ घ्यावा. मात्र हा नंबर आपल्या ग्राहक क्रमांक मोबाईलला हा नंबर रजिस्टर असावा. याद्वारे ग्राहकांना वीजबिल डाउनलोड करणे, वीजबिल भरणे, तक्रार नोंदवणे, तक्रार स्थिती तपासणे, तसेच यावर गो ग्रीन सेवा उपलब्ध आहेत.”
महावितरण कार्यालयाने पुढील काळात मागण्याची दखल न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा भूमिपुत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत कुटे यांनी दिलाय.