राजकिय

जेष्ठ नेते वळसे पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या प्रस्तावावर चर्चा

0 0 4 4 0 6

*आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील विकासकामांसाठी वळसे-पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट*
————-
मंचर/पुणे
बातमी : रवींद्र खुडे, संपादक खुडेज टुडेज न्यूज (9422650735)
————–

आंबेगाव-शिरूर मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे ज्येष्ठ नेते ना. दिलीप वळसे पाटील यांनी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी आंबेगाव तालुक्यातील प्रलंबित सिंचन योजना, धरणांची सुरक्षा, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आणि आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधांचे महत्त्वपूर्ण विषय मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. या सर्व मागण्यांवर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर ठोस कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
या भेटीत खालील महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली:

*१. डिंभे धरणाची सुरक्षा आणि गळती रोखण्यासाठी १७१.५९ कोटींचा प्रस्ताव:*
कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठे असलेल्या डिंभे धरणातून होणारी मोठी गळती हा चिंतेचा विषय आहे. धरण सुरक्षा कायदा २०२१ अंतर्गत धरण सुरक्षिततेसाठी आणि ही गळती थांबवण्यासाठी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने *१७१.५९ कोटी रुपयांच्या* प्रस्तावास मान्यता दिली आहे. धरणाचे आयुष्य वाढवण्यासाठी आणि भविष्यातील धोका टाळण्यासाठी या निधीला तातडीने प्रशासकीय मान्यता देऊन काम सुरू करण्याची विनंती वळसे-पाटील यांनी केली.

*२. सिहंस्थ कुंभमेळा २०२७: भीमाशंकर परिसरात ३३/११ के.व्ही. उपकेंद्र:*
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसरात अखंडित वीज पुरवठ्यासाठी *डिंभे येथे ३३/११ के.व्ही. उपकेंद्र* उभारणे आवश्यक आहे. यासाठी जलसंपदा विभागाची ६० आर जमीन महावितरणला हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करून त्याला मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली.

*३. मंचर शहरासाठी १३३.५१ कोटींची वाढीव पाणीपुरवठा योजना:*
मंचर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, नगरपंचायतीने सादर केलेल्या *१३३ कोटी ५१ लाख रुपयांच्या* वाढीव पाणीपुरवठा योजनेला ‘नगरोत्थान महाअभियानांतर्गत’ तात्काळ मंजुरी मिळावी, जेणेकरून भविष्यातील पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करता येईल.

*४. धामणी परिसरातील ९ उपसा सिंचन योजनांना वीज पुरवठा:*
आंबेगावच्या पूर्व भागातील दुष्काळी धामणी परिसरातील शेतकऱ्यांनी लोकसहभागातून ४.५० कोटी रुपये खर्चून ९ उपसा सिंचन योजना पूर्ण केल्या आहेत. मात्र, महावितरणकडून वीज जोडणी मिळत नसल्याने १२०० एकर जमीन ओलिताखाली येण्यास अडथळा निर्माण होत आहे. या योजनांना तातडीने वीज पुरवठा करण्याचे आदेश देण्याची विनंती वळसे-पाटील यांनी केली.

*५. कुकडी प्रकल्पांतर्गत ३ नवीन उपसा सिंचन योजना:*
कुकडी प्रकल्पाचा भाग म्हणून आदिवासी भागातील *कळमजाई, बोरघर आणि फुलवडे* या तीन उपसा सिंचन योजनांना मंजुरी मिळाली असून पाणी परवानाही उपलब्ध आहे. या योजनांचे सविस्तर अंदाजपत्रक तयार करून कामांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत चर्चा झाली. यामुळे या भागातील सुमारे १५८५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

“मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न, पिण्याच्या पाण्याची समस्या आणि भीमाशंकर तीर्थक्षेत्राचा विकास हे आमचे प्राधान्य आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सर्व विषयांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.” – दिलीप वळसे पा. सदस्य, विधानसभा, महाराष्ट्र राज्य.

5/5 - (2 votes)

खुडेज टुडेज न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 4 0 6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे