जिंतूर तालुक्यातील मातंग समाजाच्या तरुणाची हत्या ?
मातंग समाजातील संघटना आक्रमक, मानवी हक्क अभियानाच्या पदाधिकाऱ्यांचा पाठपुरावा सुरु

*जिंतूर तालुक्यातील मातंग समाजातील महेश रणखांबे हत्तेचा कसून तपास करा : मानवी हक्क अभियान*
———
जिंतूर/परभणी प्रतिनिधी
दि. 16/04/2026.
———
परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात असणाऱ्या मौजे येलदरी येथील मातंग समाजाचा तरुण श्री महेश रणखांबे याची हत्या झाल्याची माहिती मिळताच, मानवी हक्क अभियान च्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशन गाठले. यावेळी जिल्हाध्यक्ष पप्पूराज शेळके, अरुण सोनवणे, जिंतूर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष राहुल मोहिते, जिंतूर तालुका अध्यक्ष भवन आठवले, हिंगोली जिल्हाध्यक्षा राधिका चिंचोलीकर, परभणी जिल्हा संपर्कप्रमुख मारुती साठे, मानवत तालुकाध्यक्ष अजय हिवाळे, विदर्भ अध्यक्ष गजानन खंदारे, विदर्भ कार्याध्यक्ष तसेच वाशिम जिल्हाध्यक्ष संतोष लोखंडे आदींनी पोलीस स्टेशन गाठत, संपूर्ण घडामोडिंचा आढावा घेतला. त्यानंतर येलदरी येथील मयत महेश रणखांबे यांच्या घराभोवती फॉरेन्सिक लॅबच्या कर्मचाऱ्यांनी व डी वाय एस पी जीवन बेनिवाल यांच्या संपूर्ण तपासानंतर, सदर रिपोर्ट फॉरेन्सिकला छ. संभाजीनगर येथे मुख्यालयात पाठवल्यानंतर, महेश अरुण रणखांबे यांचे पोस्टमार्टम करण्यात आले.
पोलिसांच्या तपासाबाबत आम्ही समाधानी असून, या तपासात आरोपीला कुठल्याच प्रकारे सुटका मिळणार नाही याची खात्री आम्हा सर्वांना पटलेली असून, आजूबाजूच्या परिसरात केलेल्या चौकशीअंती, या गुन्ह्यात अजून तीन आरोपी वाढण्याची शक्यता असल्याचा संशय आमच्या टीमने जिंतूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सरोदे व तपास अधिकारी डी वाय एस पी जीवन बेनिवल यांच्याकडे व्यक्त केला. त्यामुळे आमच्या मानवी हक्क अभियानच्या संपूर्ण टीमला आश्वासित करताना, या गुन्ह्याचे तपासीय अधिकारी पो नि श्री बेनिवल यांनी सांगितले की, “आम्ही योग्य पद्धतीने मयत अरुण रणखांबे यांना न्याय मिळण्याच्या संदर्भात कुणालाही पाठीशी घालणार नाही.”
यावेळी अरुण रणखांबे यांची मुलगी कुमारी स्नेहा अरुण रणखांबे, त्यांची भाऊजय श्रीमती अनिता रणखांबे व इतर नातेवाईक उपस्थित होते.
“मानवी हक्क अभियान” टीमच्या वतीने पो नि श्री सरोदे यांना निवेदन देण्यात आले असून यात स्पष्ट म्हटले आहे की, “सदर प्रकरणात योग्य तपास करण्यात यावा. सदर केस ही फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावी. अरुण रणखांबे यांचे कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे. त्यांना शासनाच्या निकषानुसार तात्काळ मदत देण्यात यावी. त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत घेण्यात यावे. ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार आरोपीची मालमत्ता जप्त करण्यात यावी.”
या निवेदनावर पप्पू राज शेळके, अरुण सोनवणे, रावण मोहिते, राधिका चिंचोलीकर, गजानन खंदारे, भारत आंबोरे, संतोष लोखंडे, बळीराम गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या असून, आम्ही या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करू असे या मानवी हक्क अभियान टीमने स्पष्ट केले आहे.