महाराष्ट्र

शिरूर तालुक्यात स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने कुंभार समाजाला ओळख पत्रांचे वाटप

तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व भगवान श्रीमंदीलकर यांचा पाठपुरावा

0 0 8 2 3 4

शिरूर तालुक्यात स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कुंभार बांधवांना तहसीलदारांच्या हस्ते ओळखपत्रांचे वाटप
——
शिरूर : दि. 15/08/2026.
——
बातमी : रविंद्र खुडे, संपादक 9422650735.
——

महाराष्ट्र शासनाने १० जून २०२६ रोजी कुंभार समाजाच्या विविध हक्क, कल्याणकारी योजना, आणि पारंपारीक व्यवसायाच्या संरक्षणासाठी काढलेल्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयाची, शिरूर तालुक्यात अतिशय प्रभावी व गतिमान अंमलबजावणी झाली आहे. शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या कर्तव्यदक्षतेतून व भगवान श्रीमंदीलकर यांच्या पाठपुराव्यातून, स्वातंत्र्यदिनी कुंभार समाज बांधवांना त्यांच्या हक्काच्या अधिकृत ओळखपत्रांचे (ID Cards) सन्मानपूर्वक वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे वर्षानुवर्षे उपेक्षित राहिलेल्या कारागीर बांधवांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळण्याचा मार्ग सुकर झाला आणि १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनाचे मुख्य ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर, शिरूर येथे एका विशेष कार्यक्रमात तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या शुभहस्ते, तालुक्यातील पात्र कुंभार बांधवांना अधिकृत ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. हे ओळखपत्र हाती मिळताच समाजबांधवांच्या चेहऱ्यावर आनंद आणि कृतार्थतेची भावना स्पष्टपणे दिसून आली.

यावेळी बोलताना तहसीलदार बाळासाहेब म्हस्के म्हणाले की, “शासकीय योजनांचा थेट लाभ प्रत्येक कारागिरापर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. १० जून २०२६ चा शासन निर्णय हा पारंपरिक मातीकाम करणाऱ्या कुंभार समाजाच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. शासन निर्णयातील तरतुदी आणि सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील प्रत्येक कारागिरापर्यंत पारदर्शकपणे पोहोचवीणे हे आमचे प्रशासकीय कर्तव्य आहे. या अधिकृत ओळखपत्रामुळे समाजबांधवांना प्रशासकीय कामात, योजनांच्या लाभासाठी व व्यवसायाशी संबंधित परवानग्या मिळवण्यात मोठी सुलभता येईल. तहसील प्रशासन यापुढेही समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील.”

शासनाचा १० जून २०२६ चा निर्णय केवळ कागदावर मर्यादित न राहता प्रत्यक्ष जमिनीवर उतरावा, यासाठी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी विशेष प्रशासकीय मोहीम राबवून ही प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करून घेतली. या संपूर्ण उपक्रमामध्ये शिरूर तहसील कार्यालयातील लिपिक भानुदास येडे यांनी घेतलेले अथक परिश्रम आणि दाखवलेली प्रशासकीय तत्परता अत्यंत मोलाची ठरली. पात्र लाभार्थ्यांची अचूक यादी तयार करणे, माहिती संकलन आणि ओळखपत्रांची वेळेत छपाई पूर्ण करण्यासाठी येडे यांनी उत्तम समन्वय साधत मोठे योगदान दिले.

“शासनाच्या १० जूनच्या निर्णयाची इतक्या कमी वेळेत आणि कार्यक्षमतेने अंमलबजावणी करून कुंभार समाजाला सन्मान मिळवून दिल्याबद्दल शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के आणि लिपिक भानुदास येडे यांचे संपूर्ण समाजबांधवांच्या वतीने आभार व्यक्त करत, तहसीलदार म्हस्के यांचा सन्मान करण्यात आला.

स्वातंत्र्यदिनी मिळालेले हे ओळखपत्र आमच्या बांधवांसाठी स्वाभिमानाची आणि हक्काची नवी ओळख ठरले आहे असे मत अनेक समाजबांधवांनी यावेळी व्यक्त केले.

  1. या सोहळ्यास तालुक्यातील कुंभार समाजातील ज्येष्ठ, कार्यकर्ते आणि बहुसंख्य समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे शिरूर तालुक्यातील संपूर्ण कुंभार समाजात समाधानाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
    यावेळी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, भूमी अभिलेख विभागाचे उपअधिक्षक अमोल भोसले, नगरसेविका सविता राजापूरे, नगरसेविका स्वप्नाली जामदार, राजर्षी शाहू प्रतिष्ठानचे राज्याध्यक्ष भगवान श्रीमंदीलकर, शिरूर ग्रामीणचे माजी सरपंच रामदास जामदार, मच्छिन्द्र जामदार, शशिकांत शिर्के, विजय शिर्के, दत्तात्रय काळे यांच्यासह मोठया सख्येने कुंभार समाज बांधव उपस्थित होते.
5/5 - (1 vote)

खुडेज टुडेज न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 8 2 3 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे