ब्रेकिंग

पारोडी येथील शेतकरी येळे कुटुंबियांवर गुन्हे दाखल, त्यात भूमि अभिलेखच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याने एकच खळबळ

भूमि अभिलेखचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर

0 0 2 9 7 7

शिरूर पोलिस स्टेशनला येळे कुटुंबियांच्या शेतीसंदर्भात गुन्हे दाखल, त्यात भूमि अभिलेखच्या तीन कर्मचाऱ्यांचाही समावेश
—————
*”जमीन बळकावण्यासाठी जुन्या दस्तऐवजामध्ये छेडछाड : भूमि अभिलेख शिरूरवर संक्रांत, भूमि अभिलेखचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आल्याने एकच खळबळ”*
—————
शिरूर : दि. २०/०१/२०२६.
शिरूर तालुक्यातील पारोडी येथील शेतजमीन बळकावण्यासाठी १९६७ च्या एकत्रिकरण नोंदींमध्ये छेडछाड करून बनावट जबाब, खोट्या सह्या व शिक्के तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिरूर येथील उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील ३ कर्मचाऱ्यांसह १३ जणांवर शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील परिरक्षण भूमापन संतोष नामदेव काळाणे, अभिलेखपाल विनोद व्यंकटेश सूर्यवंशी, शिपाई बेबीनंदा जयचंद्र शिंदे या तीन कर्मचाऱ्यांसह, मौजे पारोडी येथील सोपान विष्णू येळे, निवृत्ती विष्णू येळे, चिंतामण विष्णू येळे, सुदाम विष्णू येळे, पांडुरंग विष्णू येळे, अमोल चिंतामण येळे, दिलीप निवृत्ती येळे, अविनाश चिंतामण येळे, प्रविण निवृत्ती येळे, विशाल पांडुरंग येळे ( सर्व रा. येळेवस्ती, पारोडी, ता. शिरूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
या प्रकरणी पोपट गंगाराम येळे (रा. पारोडी, ता. शिरूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शिवतक्रार म्हाळुंगी येथील गट नं. १६ ही जमीन त्यांचे आजोबा कृष्णा ऊर्फ किसन तात्या येळे यांच्या नावावर सन १९५७ च्या वाटपानुसार व १९६४-६५ मधील एकत्रिकरण योजनेनुसार वैधरीत्या नोंदलेली होती. संबंधित जमिनीवर १९६६ पासून सातत्याने सातबरा उताऱ्यावर फिर्यादी कुटुंबाचे नाव नोंदलेले होते. बँक कर्ज, वारस फेरफार व इतर अधिकृत नोंदींमधूनही हा हक्क निर्विवाद असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, सर्व संशयितांनी संगनमत करून गट नं. १६ बाबत १० जानेवारी १९६७ रोजीचा तथाकथित जबाब बनावटरीत्या तयार केल्याचा आरोप आहे. या खोट्या जबाबावर मयत कृष्णा तात्या येळे यांचा खोटा अंगठा उमटवण्यात आला असून पंच म्हणून दगडू बाबुराव पाटील यांची बनावट सही, तसेच सहाय्यक एकत्रिकरण अधिकारी ८३, पुणे, यांची खोटी सही व शिक्के लावण्यात आले आहे. हा बनावट दस्तऐवज नंतर जिल्हा न्यायालय पुणे येथील अपिल क्र. ३३९/ २०२२ मध्ये खरा पुरावा म्हणून सादर करण्यात आला आहे.
भूमी अभिलेख कार्यालयातील मूळ एकत्रिकरण कागदपत्रे, खाते उतारे व जबाब पुस्तिकेतील पाने आरोपींनी संगनमताने नष्ट केली. या संदर्भात माहिती मागविल्यानंतर कार्यालयाने ३१ जुलै २०२३ रोजी संबंधित जबाब अभिलेखात उपलब्ध नसल्याचे लेखी उत्तर दिले आहे. त्यामुळे बनावट कागदपत्रांचा संशय अधिक बळावला आहे.
या प्रकरणाची दखल घेत घोडनदी येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा अधिक तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भागवत हे करीत आहेत.

5/5 - (1 vote)

खुडेज टुडेज न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 9 7 7

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे