निमोणे येथील काळे कुटुंबियांना हक्काचा मिळाला शेत रस्ता : केले मुरुमीकरण
प्रगतीचा मार्ग खुला झाल्याची पीडित शेतकऱ्यांची प्रतिक्रिया

*निमोणे येथील काळे कुटुंबियांना हक्काचा मिळाला शेत रस्ता, केले मुरमिकरण : प्रगतीचा मार्ग खुला*
——
निमोणे / शिरूर (पुणे)
बातमी : रविंद्र खुडे, संपादक, खुडेज टूडेज न्यूज,
संपादक : शिवपाणंद न्यूज चॅनेल. (लाईव्ह)
9422 650 735..
——
शिरूर तालुक्यातील मौजे निमोणे या महसूल गावातील काळे कुटुंबियांचा शेतरस्ता, भावकीतील वादामुळे गेली 4-5 वर्ष बंद होता. त्यामुळे निमोणे – कर्डे रस्त्यावरील काळे वस्तीतील गट नंबर 801, 802, 804 व 805 मधील शेतकऱ्यांच्या प्रगतीचा मार्ग खुंटलेला होता. त्यांना दुसऱ्याच्या दारात आपली वाहने लावून, दुसऱ्यांच्या बांधावरून आपापल्या घरी जावे लागत होते. या अडचणीमुळे पाहुणे रावळेही येण्याचे टाळत होते. एकीकडे शेती व शेतमालाचे नुकसान आणि त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान. तर दुसरीकडे मुलांच्या शिक्षणात येणारे अडथळे या सर्व गोष्टी सहन करत ही कुटुंबे जगत होती.
गेली चार पाच वर्षांच्या संघर्षात त्यांना महसूल विभागातील तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय व पुढे न्यायालयात अगदी उच्य न्यायालयापर्यंत फेऱ्या मारून खूप मोठा आर्थिक भार सहन करावा लागल्याने, सर्व शेतकरी आर्थिक दृष्ट्याही मेटाकुटीला आलेले होते.
मात्र महाराष्ट्र शासन व महसूल मंत्र्यांच्या अनेक धडाकेबाज शासन निर्णय व शासन आदेशांच्या दुरुस्त्यांमुळे, हजारो शेतकऱ्यांना फायदा झाला असून शेतकरी समाधानी होत आहेत.
त्याचबरोबर “महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेत रस्ते चळवळ,” च्या माध्यमातून वेळोवेळी केलेले राज्यभर दौरे, मुंबई मंत्रालय, मुंबई विधान भवन, नागपूर विधान भवन येथील आंदोलने, मोर्चे, पत्रव्यवहार, पाठपुरावा ई. मुळे राज्यभरातील शेतरस्ते पीडित शेतकरी एकत्र आलेले होते. त्यांच्या राज्यभरातील संघर्षातून राज्यशासनाला शेतकऱ्यांच्या समस्या पटवून देत, शेतरस्त्यांची सर्वसामान्य व लहान शेतकऱ्यांना असणारी आवश्यकता वेळोवेळी शासनापर्यंत चळवळीच्या माध्यमातून, या चळवळीचे प्रणेते तथा अध्यक्ष शरद पवळे यांनी व राज्यभरातील अन्य पदाधिकारी व समन्वयकांनी दाखवून दिलेली होती.
निमोणे येथील शेत रस्ता पीडित काळे कुटुंबियांमधील रमेश काळे व काही ग्रामस्थ या चळवळीला जोडले गेल्याने, चळवळीच्या अनेक बैठकामधून त्यांनी त्यांचा प्रश्न मांडलेला होता. या सर्वांच्या सहकार्याने आम्हाला न्याय मिळाल्याचे मत काळे कुटुंबियांनी व्यक्त केले.
त्याचबरोबर या रस्त्यासंदर्भात महसूल कोर्ट व न्यायालयातील बाजू, ॲड ज्योती पवार आणि ॲड राजेश खिलारे यांनी न्यायालयासमोर योग्यरीत्या मांडल्यामुळे आमच्या अनेक वर्षाच्या लढाईला यश मिळाले असून, आमचा रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला असल्याचे मत काळे कुटुंबियांनी प्रसार माध्यमांना माहिती देताना व्यक्त केले.
या रस्त्यासाठी रमेश बापूराव काळे, संतोष बापूराव काळे, सोनबा बाबुराव काळे, प्रल्हाद बाबुराव काळे, बबन प्रभू काळे, पोपट जयसिंग काळे, भरत जयसिंग काळे यांनी अनेक वर्ष संघर्ष केला होता. मात्र आता हक्काचा रस्ता झाल्याने या सर्वांनी त्यावर मुरुमीकरण करून घेतले आहे.
अशा रस्त्यांमुळे शेतकऱ्यांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होत असून, शासन, प्रशासन घेत असलेल्या ठाम निर्णयांचे स्वागत शेतकरी वर्गातून होत आहे.
तर या सर्व मंडळींनी शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, मंडलाधिकारी नंदकुमार खरात, निमोणे चे ग्राम महसूल अधिकारी कपिल बोडरे व सौरभ ईश्वरे, महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेत रस्ते चळवळीचे प्रणेते तथा अध्यक्ष शरद पवळे, चळवळीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख तथा पत्रकार प्रा. रविंद्र खुडे, पुणे जिल्हा समन्वयक विजय शेलार, तालुका समन्वयक तथा निवृत्त पोलीस अधिकारी नानासाहेब काळे, अनिल लगड, मंगेश निंबाळकर, निमोणे गावचे आजी माजी सरपंच, पदाधिकारी व या कामी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे ऋण व्यक्त केले.