शिरूरचे सा कार्यकर्ते निलेश वाळुंज यांच्या आंदोलनास पोलीस अधीक्षकांची भेट, आंदोलन स्थगित
पोलीस अधिक्षकांनी तब्बल दोन तास केली चर्चा, अनेक गोष्टींचे दिले आश्वासन

सा कार्यकर्ते निलेश वाळुंज यांच्या बेमुदत धरणे आंदोलनास पोलीस अधीक्षकांची भेट : सकारात्मक चर्चेतून थांबवले आंदोलन
———-
शिरूर : दि. 24/04/2026.
बातमी : रवींद्र खुडे, संपादक, शिरूर 9422 650 735.
————–
“शिरूर मध्ये जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या लढ्याला यश. ९ दिवसांच्या सत्याग्रहानंतर पोलिस प्रशासन सक्रिय. पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांची आंदोलनस्थळी भेट. दोन तास झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर तोडगा निघाल्याने सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांचे आंदोलन स्थगित. अप्पर मुख्य सचिव (गृह) मनीषा पाटणकर व पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनीही या प्रकरणाची घेतली होती दखल.
शिरूर तालुक्यात वाढत चाललेले अवैध धंदे, गावठी दारू, अमली पदार्थ व वाढती गुन्हेगारी याविरोधात विविध मागण्यांसाठी उभारण्यात आलेल्या बेमुदत सत्याग्रह आंदोलनाला 9 व्या दिवशी यश मिळालेले आहे.
या आंदोलनाची शासन व प्रशासन स्तरावर वरिष्ठ स्तरावर गांभीर्याने दखल घेत, जिल्हा पोलिस प्रशासनाने शिरूर तालुक्यात गुन्हेगारी मोडीत काढण्याचा व नशामुक्तीसाठी तसेच कायद्याचा धाक प्रभावीपणे प्रस्थापित करण्यासाठी विशेष मॉडेल म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी गुरुवारी दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी रात्री उशिरा शिरूर येथे येत, आंदोलनकर्ते व सामाजिक कार्यकर्ते नीलेश वाळूंज यांची भेट घेऊन सुमारे दोन तास सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर त्यांच्या आश्वासनावर सकारात्मक निर्णय घेत आंदोलन स्थगित करण्यात आलेय.
यावेळी शिरूरचे ऊपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे, घोडनदी वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. उदय सरोदे, अॅड. अभिषेक बाफना, किरण कुरंदळे, ज्ञानेश्वर कुरंदळे आदी उपस्थित होते.
मुख्य निर्णय व कृती आराखडा :
शिरूर तालुक्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी व अवैध धंद्यांविरोधात विशेष कृती आराखडा.
स्वतंत्र पथके व फ्लाईंग स्कॉडमार्फत सातत्यपूर्ण कारवाई. संबंधित अधिकारी/कर्मचारी सहभागी आढळल्यास तात्काळ कठोर कारवाई.
एमडी (MD) या अमली पदार्थाविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असून, कोणालाही सोडले जाणार नाही. सर्व कारवायांचा सखोल तपास व व्यापक मोहीम राबवली जाईल. नशामुक्तीसाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये समुपदेशन, युवक मेळावे व जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच भारतीय राज्यचिन्हांचा गैरवापर व आमदार, खासदार नावाच्या स्टिकर्स चा बेकायदेशीर वापर व असे स्टिकर्स अनाधिकाराने लावणाऱ्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
*सविस्तर चर्चा :*
सुमारे दोन तास चाललेल्या चर्चेदरम्यान पोलीस अधीक्षकांनी सर्व मुद्दे गांभीर्याने ऐकून प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली. आवश्यक ती कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येईल, तसेच अधिकारींवरील पुढील कारवाईसाठी अधिक आवश्यक पुरावे सादर केल्यानंतर निष्पक्ष कारवाई करण्यात येईल असेही आश्वासन देण्यात आले.
यावर प्रतिक्रिया देताना आंदोलनकर्ते सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज म्हणाले की, “ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय अण्णा हजारे यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन हा लढा उभारण्यात आला होता. समाजातील विविध घटकांचा सक्रिय सहभाग आणि पाठिंबा यामुळेच वरिष्ठ स्तरावर दखल घेऊन प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने याबाबत त्यांचे स्वागत आहे. पोलिस अधीक्षक यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली. समाजहितासाठी पुढील काळातही पाठपुरावा सुरू राहील.”
हे यश आंदोलनाला साथ देणाऱ्या सर्व नागरिकांचे असल्याचे मत, आंदोलनकर्ते व सामाजिक कार्यकर्ते नीलेश वाळूंज यांनी, एका जाहीर नाम्याद्वारे व्यक्त केलेत.