UPSC परीक्षेत मातंग समाजाच्या नाशिक येथील प्रेरणा कैलास खवळे यांचे यश
शासनाच्या आर्टि संस्थेमुळे मिळाले पाठबळ

‘यूपीएससी’ परीक्षेत मातंग समाजाच्या प्रेरणा कैलास खवळे यांचे दैदीप्यमान यश.
बातमी : रवींद्र खुडे
संपादक, खुडेज टुडेज न्यूज नेटवर्क,
शिरूर : दि. 07/03/2026.
——–
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेत नाशिकच्या प्रेरणा कैलास खवळे हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. या यशाबद्दल तिचे ‘आर्टी’चे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे व निबंधक इंदिरा अस्वार यांच्या वतीने तिच्या यशाचा गौरव करण्यात आला आहे.
ऑगस्ट २०२५ मध्ये ‘नागरी सेवा’ मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. तर डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान मुलाखती पार पडल्या होत्या. या परीक्षेचा अंतिम निकाल काल जाहीर झाला असून, या निकालात नाशिकच्या प्रेरणा खवळे हिने देशात ९१३ वा रॅंक पटकावून प्रशासकीय सेवेत जाण्याचे आपले व आपल्या कुटुंबियांचे स्वप्न साकार केले आहे.
*’आर्टी’चे पाठबळ* प्रेरणा ही मातंग समाजातील असून तिने मिळवलेले हे यश समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे. अनुसूचित जातीतील, विशेषतः मातंग समाजातील उमेदवारांना यूपीएससी मुलाखतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), मुंबई मार्फत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. प्रेरणाला देखील या योजनेचा लाभ मिळाला. ज्यामुळे तिच्या मुलाखतीच्या तयारीतील आर्थिक अडथळे दूर होण्यास मदत झाली.
“अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत प्रेरणाने मिळवलेले यश हे तिच्या जिद्दीचे आणि कष्टाचे फळ आहे. आर्टीच्या माध्यमातून युपीएससीची तयारी करण्यासाठी उमेदवारांना दिल्ली येथील नामांकीत संस्थेत पाठवले जाते. तसेच मुलाखतीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना आर्टीकडून आर्थिक सहाय्य दिले जाते त्यामुळे विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार होण्यास प्रोत्साहण मिळते”, असे मत सुनील वारे, व्यवस्थापकीय संचालक, अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), मुंबई, यांनी प्रेसनोट जाहीर करत तसेच प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केलेय.
प्रेरणा कैलास खवळे या मातंग समाजातील नाशिक येथील हुशार विद्यार्थिनीचे मातंग समाजातील अनेक संस्था, संघटना, तसेच आजी माजी सनदी अधिकारी, राजकीय तसेच सर्वच क्षेत्रातून कौतुक होत आहे.
“खुडे’ज टुडेज न्यूज नेटवर्क मराठी” च्या वतीनेही प्रेरणा यांना खूप खूप शुभेच्छा. आणि प्रेरणा यांच्या या यशाची अनेकांना प्रेरणा मिळो हीच सदिच्छा.