नाणेकर वाडीचे सरपंच संदेश साळवे यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा
मातंग समाजातील एक कर्तबदार व्यक्ती हरपल्याची सर्वत्र भावना.

*चाकणच्या नाणेकरवाडीचे सरपंच संदेश साळवे यांचे अकाली निधन*
——————–
बातमी : रवींद्र खुडे, संपादक
शिरूर/पुणे : 9422650735.
दि. 27/02/2026.
———————
पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर तालुक्यात असणाऱ्या व झपाट्याने वाढत असलेल्या चाकण MIDC लगत असणाऱ्या नाणेकर वाडीचे सरपंच संदेश साळवे हे मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील देवीभोयरे गावचे होते. देविभोयरे ग्राम पंचायतचे कर्मचारी निवृत्ती साळवे यांचे ते पुतणे होते. तसेच पत्रकार विनोद साळवे, सदस्य महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पारनेर, यांचे ते बंधू होते.
संदेश साळवे हे अगदी प्रतिकूल परिस्थितीत चाकण येथे नोकरी व्यवसायानिमित्त स्थिर झाले. चाकण हे भारतातील वेगाने विकसित झालेले सर्वात मोठे ऑटोमोबाईल हब आहे. अनेक जागतिक स्तरावरील कंपन्या इथे आहेत. याच ठिकाणी संदेश साळवे यांनी हॉटेल व्यवसायातून सामजिक काम चालू केले. नाणेकरवाडी गावात त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त केली. गरजू, गरीब लोकांची कामे केली. सर्व स्तरात लोकप्रिय झाले. गरीब कुटुंब असूनही गावची नाळ त्यांनी तुटू दिली नाही. नवरात्र उत्सवात, पालखी सोहळ्यात दोस्ताना म्युझिकल बेंजो तत्कालीन काळात प्रसिद्ध असे. त्याचे सौजन्य संदेशजी देत. माथाडी कामगार युनियन अध्यक्ष म्हणूनही ते काम पाहत. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्याशी त्यांचा चांगला संबंध होता. नाणेकरवाडी सरपंच पद आरक्षित झाले. सतत लोकांच्यात असल्याने ते निवडणुकीत जिंकले. आणि त्यांना बिनविरोध सरपंच करण्यात आले. सर्वांना धरून, प्रामाणिक, उत्तम कारभार करत ते कार्यरत होते. शेवटी नियतीपुढे कुणाचेच काही चालत नाही. त्यांच्या निधनाने देवीभोयरे ग्रामस्थ, पारनेर तालुका, शिरूर, खेड, आंबेगाव तालुक्यात तसेच पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे.