कृषीवार्ता

शिवपाणंद शेतरस्ते चळवळीची स्तुत्य कामगिरी

चळवळीच्या मध्यस्थीने कासार पिंपळगावचा शेत रस्ता खुला

0 0 8 2 3 4

*शिवपानंद शेत रस्ता चळवळीचा पुन्हा विजय : कासार पिंपळगाव येथे शेतरस्ता खुला*
——–
पाथर्डी : दि. 16/04/2026.
बातमी : रवींद्र खुडे, संपादक
9422 650 735..
——-

महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेत रस्ता चळवळीच्या प्रभावी कामगिरीचा आणखी एक यशस्वी अध्याय पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथे पहायला मिळाला. दीर्घकाळ प्रलंबित असलेला शेतरस्त्याचा प्रश्न अखेर तडजोडीतून मार्गी लागला असून, चळवळीच्या हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
मंगळवार दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी कृती समितीने या प्रकरणात सक्रिय भूमिका बजावली. समितीचे सदस्य विठ्ठल निर्मल, विकास जाधव, पोपट शेळके आणि अशोक कचरे यांनी प्रत्यक्ष स्थळाला भेट देत वादी व प्रतिवादी यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. दोन्ही बाजूंचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत, विश्वासाचे वातावरण निर्माण करत आणि कायदेशीर बाबी समजावून सांगत अखेरीस दोन्ही पक्षांमध्ये तडजोड घडवून आणण्यात यश आले.

विशेष म्हणजे हा प्रश्न प्रशासनाच्या पातळीवर सुटणे अपेक्षित असताना, तहसील व प्रांत कार्यालयाकडून वेळोवेळी केवळ तारखा देण्यात आल्याने वादी व प्रतिवादी या दोघांनाही मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत होता. दीर्घकाळ चाललेल्या या प्रक्रियेमुळे दोन्ही पक्षांमध्ये नाराजी वाढत होती. या पार्श्वभूमीवर संबंधित शेतकऱ्यांनी शिवपानंद शेत रस्ता चळवळीशी संपर्क साधला. मढी येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात त्यांनी आपली समस्या मांडल्यानंतर पाथर्डी कृती समितीने तातडीने या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी समिती सदस्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. चर्चेदरम्यान दोन्ही पक्षांना न्याय मिळेल, कोणावरही अन्याय होणार नाही याची विशेष काळजी घेतली गेली. संयम, संवाद आणि कायदेशीर मार्गदर्शन यांच्या आधारे अखेर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली आणि शेतरस्ता खुला करण्याचा मार्ग मोकळा झाला.

या यशस्वी तोडग्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, शिवपानंद शेत रस्ता चळवळीबद्दल विश्वास अधिक दृढ झाला आहे. शेतरस्त्यांच्या प्रश्नावर चळवळ केवळ आंदोलनापुरती मर्यादित न राहता, प्रत्यक्षात तोडगे काढून देत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

या प्रसंगी पाथर्डी कृती समितीचे सदस्य विठ्ठल निर्मल, पोपट शेळके, अशोक कचरे, विकास जाधव तसेच वादी-प्रतिवादी पक्षातील अलका जगताप, विठ्ठल जगताप, सतीश जगताप, अशोक जगताप, ज्ञानदेव जगताप, विक्रम जगताप, अर्जुन शेळके, प्रयागा जगताप आदी उपस्थित होते.

  • शिवपाणंद शेत रस्ते चळवळीचे प्रणेते तथा अध्यक्ष शरद पवळे, यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर सुरु असलेल्या शेतकरी हिताच्या अशा चांगल्या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
5/5 - (2 votes)

खुडेज टुडेज न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 8 2 3 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे