राजकिय

मा. मंत्री व काँग्रेसचे जेष्ठ नेते अनंतराव थोपटे काळाच्या पडद्याआड

राष्ट्रीय काँग्रेसचे एकनिष्ठ नेते अनंतात विलीन

0 0 8 2 3 4

*पुणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील महामेरू, माजी मंत्री अनंतराव थोपटे अनंतात विलीन*
———
बातमी प्रतिनिधी : रवींद्र खुडे, संपादक
भोर/पुणे : दि. 04/06/2026.
———
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे वयाच्या 93 व्या वर्षी वार्धक्याने, गुरुवार दि. 04 जून 2026 रोजी निधन झालेय.
पुण्यातील खाजगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. संध्याकाळी 7 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. राजकारणातील एक महामेरू हरपल्याने, संपूर्ण राज्यासह भोर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. आपल्या कॉलेज जीवनात त्यांनी कुस्ती क्षेत्रामध्ये मोठे नाव कमावले होते. ते कुस्तीत युनिव्हर्सिटी चॅम्पियन देखील राहिले होते. काही काळ त्यांनी शासकीय नोकरी केली. नोकरी करत असतानाच अचानक 1972 साली भोरच्या सक्रिय राजकारणात त्यांचा प्रवेश झाला. त्यांनी आपल्या कारकिर्दीतील पहिली निवडणूक ही काँग्रेस पक्षाच्या विरोधात लढवून अपक्ष म्हणून निवडून आले होते. नंतर ते काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय झाले. अनंतराव थोपटे सलग 6 वेळा भोर तालुक्याचे आमदार होते. तर 14 वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होते. कृषी, दुग्धविकास, ग्रामविकास, पर्यटन, अशी अनेक कॅबिनेटची मंत्रीपदे अनंतराव थोपटे यांच्याकडे काँग्रेस पक्षाने सोपावलेली होती. काही काळ ते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा होते. भोर तालुक्यातील शैक्षणिक विकासामध्ये अनंतराव थोपटे यांचा सिंहाचा वाटा होता. भोर तालुक्यात राजगड ज्ञानपीठ सारखी शैक्षणिक संस्था काढल्याने, भोर तालुक्यात शिक्षणाची गंगा अनंतराव थोपटे यांच्या माध्यमातून गावोगावी पोहोचली. सहकार क्षेत्रामध्येही अनंतराव थोपटे यांचे मोठे योगदान होते.
भोर तालुक्यात राजगड सहकारी साखर कारखाना, दत्त दिगंबर वाहतूक कामगार संस्था, दूध संस्था, अशा अनेक सहकारी संस्था काढून सहकाराचे जाळे त्यांनी दुर्गम भोर व वेल्हे तालुक्यात पोहोचवले होते. फक्त भोर वेल्हा तालुकाच नव्हे तर बारामती लोकसभा मतदारसंघावर त्यांचा दबदबा होता. पुणे जिल्ह्यातील सक्रिय राजकारणात ते नेहमीच शरद पवार यांचे विरोधक म्हणून ओळखले जायचे. तरीसुद्धा या लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्यामध्ये अनंतराव थोपटे आणि त्यांचे पुत्र मा. आमदार संग्राम थोपटे यांचा सिंहाचा वाटा होता. अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव संग्राम थोपटे हे देखील भोर – वेल्हा तालुक्यातून तीन वेळा काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आमदार राहिलेले आहेत. काही दिवसापूर्वी संग्राम थोपटे यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आणि प्रथमच भोर तालुक्यामध्ये संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरूपा संग्राम थोपटे भाजपच्या चिन्हावर जिल्हा परिषदेवर निवडून आल्या. संग्राम थोपटे यांच्या भाजपा प्रवेशानंतर भोर तालुक्यामध्ये भाजपाला राजकारणामध्ये खाते खोलण्यात मोठे यश मिळाल्याचे दिसून आले.

मा. मंत्री स्व. अनंतराव थोपटे यांचा अंत्यविधी उद्या शुक्रवार दि. 05 जून 2026 रोजी दुपारी भोर येथे होणार आहे.

5/5 - (1 vote)

खुडेज टुडेज न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 8 2 3 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे