आर्थिक घोटाळाप्रकरणी आनंद नागरी सह. पतसंस्थेच्या काही जणांना अटक
आर्थिक घोटाळ्यातील मुख्य आरोपी अद्याप फरारी


आनंद नागरी सह. पतसंस्थेच्या आठ संचालक, जबाबदारांना आर्थिक घोटाळ्याप्रकरणी अटक
——–
शिरूर : दि. 14/04/2026.
——–
शिरूर शहर आणि परिसरात कित्येक कोटींचा आर्थिक अपहार करत मोठी खळबळ उडवून देणाऱ्या, आनंद नागरी सह. पतसंस्था प्रकरणी शिरूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ठेवीदारांच्या पैशांचा अपहार आणि फसवणूक केल्याप्रकरणी या पतसंस्थेच्या 8 संचालक आरोपींना अटक करण्यात आली असून, यामध्ये शहरातील प्रतिष्ठित व्यापारी आणि व्यक्तींचा समावेश आहे.
या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी व पतसंस्थेचा चेअरमन अभय चोरडिया व संचालक तथा शिरूर कृऊबास चे माजी ऊपसभापती प्रवीण चोरडिया हे दोघे भाऊ गेली कित्येक महिन्यांपासून फरार असून, शिरूर पोलीस स्टेशनकडून शहरात जागोजागी त्यांचे फोटो लावून या आरोपिंना शोधून देण्याचे आवाहन करण्यात आलेले होते. मात्र आत्तापर्यंत ते मिळून न आल्याने, बाकी संचालक हेच त्यानंतर जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याने, शिरूर शहरात मोठी खळबळ उडालेली आहे. मात्र या प्रकरणातील खरे चोर व मोठे मासे आता पोलिसांच्या जाळ्यात कधी येणार अशी चर्चा शिरूर शहरात सुरु आहे.
याप्रकरणी अटक झालेल्या संचालकांमध्ये 1) विनय वसंतलाल संघवी (वय 48, रा. आनंद सोसायटी, शिरूर), 2) भरत रतनलाल चोरडीया (वय 56, रा. शिरूर), 3) मनोज पोपटराव मुसुडगे (वय 50, रा. शिरूर), 4) वल्लभ मनसुखलाल साखला (वय 38, रा. शिरूर), 5) सुरेश शांतीलाल बोरा (वय 71, रा. शिरूर), 6) कांतीलाल बाळासो होळकर (वय ६५, रा. सादलगाव, ता. शिरूर), व आणखी दोन महिला यांना अटक करण्यात आलेली आहे.
शिरूर येथील आनंद नागरी सहकारी पतसंस्थेत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला होता. याबाबत शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला होता. या प्रकरणातील सरकार मार्फत फिर्यादी म्हणून संजय सखाराम पुंडे (वय 56 वर्ष, व्दितीय अपर विशेष लेखापरीक्षक वर्ग-2, सहकारी संस्था पुणे) यांनी वरील आरोपींचा गुन्हयात सहभाग असल्याबाबत पुरवणी जबाब दिलेला होता. या गुन्ह्यात आरोपिंचा सहभाग तपासात निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आलेली आहे.
दरम्यानच्या काळात पतसंस्थेच्या पीडित सदस्यांनी मोठा संघर्ष करत, न्यायालयीन लढा देत नवीन संचालक मंडळाची स्थापना केलेली होती. तसेच आर्थिक गैरव्यावहार करणाऱ्या चोरडिया बंधुंचे फोटो शिरूर मध्ये प्रशासनाला लावण्यास भाग पाडलेले होते. सध्या या पतसंस्थेचे कामकाज नवीन चेअरमन सुभाष छाजेड – जैन व संचालक मंडळ पाहत असून, या संचालकांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा सुरु आहे.
या कारवाईमुळे शिरूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम 420 (फसवणूक), 409 (लोकसेवाद्वारे किंवा बँकर्सद्वारे विश्वासघात), 467, 468, 471 (बनावट कागदपत्रे तयार करणे), 120 (B) (गुन्हेगारी कट रचणे) आणि 34 सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 (MPID Act) मधील कलम 3 व 4 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
- याप्रकरणी पुढील अधिक तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे हे करीत आहेत.