शिरूरचे सी टी बोरा महाविद्यालय हे उत्कृष्ठ महाविद्यालय म्हणून पुरस्कृत
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बोरा महाविद्यालयाचा डंका

सी.टी. बोरा महाविद्यालयास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार
——————
बातमी : रवींद्र खुडे, संपादक
शिरूर : दि. 11/02/2026.
——————-
पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात असणाऱ्या शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सी. टी. बोरा महाविद्यालयास, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून विद्यापीठाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त ग्रामीण विभागातील पारंपरिक महाविद्यालय गटात शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठीचा ‘उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष धरमचंद फुलपगर, संस्थेचे सचिव नंदकुमार निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते, समितीचे समन्वयक डॉ. सुनील भोईटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुरस्कार स्वीकारला. तीन लाख रुपये रोख, गौरवचिन्ह व प्रशस्तिपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप असून, या सन्मानामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
महाविद्यालयाने गेल्या काही वर्षांत शैक्षणिक गुणवत्ता, शिस्तबद्ध प्रशासन, उत्कृष्ट पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्ण व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम, शिक्षकांचे गुणवत्तापूर्ण संशोधन, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतील शोधनिबंध, कौशल्याधारित व मूल्याधारित शिक्षणपद्धती तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या सर्व क्षेत्रांत सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
‘माझी आई माझ्या कॉलेजात’, ‘रसिकलालजी सामान्य ज्ञान स्पर्धा’, विविध समाजाभिमुख उपक्रम, संशोधन व आविष्कार उपक्रम, प्रभावी प्लेसमेंट सेल, सुसूत्र मूल्यमापन प्रणाली आणि स्टार्टअप्ससाठी केलेले प्रयत्न यांची विद्यापीठाने विशेष दखल घेतली.
महाविद्यालयाचा प्लेसमेंट सेल विद्यार्थ्यांच्या करिअर जडणघडणीसाठी प्रभावीपणे कार्यरत असून विविध उद्योग, संस्था व कंपन्यांशी सामंजस्य करार (MOU) करून कॅम्पस इंटरव्ह्यू, करिअर मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असे उपक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
संशोधन व नवोपक्रमाच्या क्षेत्रातही महाविद्यालयाने भरीव कामगिरी केली असून पेटंट नोंदणी, बौद्धिक संपदा हक्क (IPR) जनजागृती, संशोधन प्रकल्प तसेच Innovation & Startup Cell यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नवकल्पनाशीलता व उद्योजकीय दृष्टिकोन विकसित केला जात आहे. काही संकल्पनांना पेटंट प्रक्रियेसाठी मार्गदर्शन मिळाले असून स्टार्टअप संस्कृतीला चालना देण्यासाठी कार्यशाळा व प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) अंमलबजावणीसाठी महाविद्यालयाने अग्रणी भूमिका घेत बहुविषयक शिक्षण, क्रेडिट प्रणाली, कौशल्यविकास, संशोधनाभिमुख व विद्यार्थीकेंद्रित उपक्रम प्रभावीपणे राबवले आहेत. पर्यावरणपूरक उपक्रम, सामाजिक बांधिलकीचे कार्यक्रम, एनएसएस, एनसीसी, माजी विद्यार्थी संघटनेचे योगदान, विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांतील यश तसेच महाविद्यालयाला प्राप्त झालेले विविध अनुदान यांचाही विद्यापीठाने विशेष उल्लेख केला.
या पुरस्कार वितरण सोहळ्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. धोंडीराम पवार, बागेश्री मंठाळकर, रविंद्र शिंगणापूरकर, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, डॉ. नितीन घोरपडे, डॉ. जोत्सना एकबोटे, सागर वैद्य, डॉ. विजय खरे, डॉ. प्रभाकर देसाई तसेच कुलसचिव चारुशीला गायके आदी मान्यवर उपस्थित होते.
या यशाबद्दल महाविद्यालय नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रकाशशेठ धारिवाल तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते, सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
हा पुरस्कार महाराष्ट्रातील इतर ग्रामीण भागातील शिक्षणसंस्थांसाठी प्रेरणादायी ठरेल असे मत प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांनी व्यक्त केले.