राजकिय

अनुसूचित जातीतील 13% आरक्षणातच अबकड ऊपवर्गीकरणासाठी शिरूर येथे मोर्चा व सभेचे 2 जुलै 2026 रोजी आयोजन

महाराष्ट्रातील अभ्यासू व नावाजलेले वक्ते करणार मार्गदर्शन

0 0 8 2 3 4

*अनु. जाती मध्ये अबकड ऊपवर्गीकरण करण्याच्या समर्थनार्थ शिरूरला मोर्चा व सभा*

शिरूर : दि. 01/07/2026.
—————-

  सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर अनुसूचित जातीमध्ये ऊपवर्गीकरण करण्यासंदर्भात, मातंग समाज पुढे सरसावलेला दिसून येत आहे. ही मागणी आजची नसून, 1990 च्या दशकापासून मातंग समाजातील दिवंगत नेते डॉ बाबासाहेब (मनोहर) गोपले यांनी केलेली होती. मात्र त्यांच्या अकाली निधनानंतर, अलीकडे मातंग समाजातील अनेक संघटनांचे नेते पुढे सरसावलेले असून, या मागणीसाठी अनेक मोर्चे व आंदोलने करत आहेत.

           याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरातही, गुरुवार दि. 2 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता मोर्चाचे व सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
हिंदुत्ववादी भाजप सरकार मातंग सामाजाच्या या मागणीच्या बाजूने असून, विरोधक मात्र त्यांच्या कर्तव्यप्रमाणे विरोध करतच आहेत. मात्र आपल्या देशाचे सर्वोच्य असणारे ठिकाण म्हणजे न्याय विभागाने मात्र, सर्व बाजूचा अभ्यास करत व विषयावर खास निवृत्त न्यायाधीशांची कमिटी बसवून, तिचा अहवाल मागितलेला होता. तो अहवालही अबकड वर्गीकरणाच्या समर्थनार्थ आलेला असल्याने, अनुसूचीत जातींमध्ये ऊपवर्गीकरण करण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केलेले आहे. या अभ्यास अहवालात इतर काही राज्यांमध्ये तसे वर्गीकरण फार पूर्वी झालेले असल्याने महाराष्ट्र राज्यातही जर अनु जातीमधील काही जाती जर अबकड ऊपवर्गीकरण मागत असतील, तर त्यांचा तो हक्क असून असे ऊप वर्गीकरण करण्यास काही अडचण नसल्याचे स्पष्ट केलेले आहे.

भारतात अनुसूचित जातीमध्ये एकूण 1200 च्या वर जाती आहेत. तर महाराष्ट्रात एकूण 59 जाती आहेत. त्यासाठी 13% आरक्षण संविधानात आहे. त्याचेच ऊपवर्गीकरण झाल्यास, या 59 जातींमधील अती मागास राहिलेल्या जातींना त्यातूनच स्वतंत्र वाटा मिळून, शिक्षण, नोकरी सह इतर बाबींमध्ये न्याय्य वाटा मिळेल असे मातंग समाजासाह अनेक दुर्लक्षित व मागासलेल्या जातींचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारही आता सकारात्मक असून, न्याय व्यवस्थेचाही ग्रीन सिग्नल असल्याने, अबकड ऊपवर्गीकरणाला वेग आल्याचे दिसत आहे.
सध्या मुंबई येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात हा ऊपवर्गीकरणाचा मुद्दा प्रचंड गाजत आहे. विरोधी पक्षाने नेहमीप्रमाणे सरकारच्या निर्णयाला विरोध करायचा म्हणून विरोध केलेला आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाचे उत्तर देताना स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, “जर एखाद्या समाजाला वाटत असेल की आम्ही अजूनही खूप मागासलेलो राहिलेलो आहोत, आणि जर आमच्या जातींमधील आरक्षणाचे ऊपवर्गीकरण केले तर त्याचा आमच्यासारख्या असंख्य अनु. जातींना फायदा होईल, आणि जर ते न्याय्य असल्याचे न्याय व्यवस्थेने सांगितले असेल तर आरक्षणात ऊप वर्गीकरण करावेच लागेल, मग यासाठी विरोध का ? प्रत्येकाला न्याय देणे हे सरकारचे कर्तव्यच आहे.” अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.

याच अबकड ऊपवर्गीकरणाच्या अनुषंगाने, पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात गुरुवार दि. 2 जुलै 2026 रोजी भव्य मोर्चा व सभेचे आयोजन करण्यात आल्याचे, सकल मातंग समाज शिरूरच्या वतीने सांगण्यात आले असून, या सभेसाठी नावाजलेले वक्ते, तसेच शिरूरसह पुणे जिल्ह्यातील व अहिल्यानगर जिल्ह्यातील अबकड वर्गीकरणाला समर्थन असणाऱ्या अनेक समाजातील लोक उपस्थित राहणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.

दि. 2 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता शिरूर शहरातील पाबळ फाटा येथे मोर्चातील सहभागी लोक जमणार असून, तेथून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पायी रॅलीला सुरुवात होऊन, पुढे विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला तसेच लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या नाम फलकाला, डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला व शहीद स्मारकला पुष्पहार अर्पण करत व अभिवादन करत तहसील कचेरी येथे या मोर्चाची सांगता होऊन, त्याच ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले असून, त्यात पाहुणे वक्ते सभेला संबोधित करणार आहेत. सभेच्या समारोपानंतर जुन्या नगर पालिका मंगल कार्यालयात मोर्चेकरुंसाठी भोजन व्यवस्था केली असल्याचेही संयोजकांनी सांगितले.

या मोर्चा व सभेला अबकड वर्गीकरणाला समर्थन असणाऱ्या अनुसूचित जातीतील व इतर समाजातील समर्थकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

5/5 - (1 vote)

खुडेज टुडेज न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 8 2 3 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे