गुन्हेगारी

शिरूर पोलीस स्टेशन आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीत झाले महत्वाचे निर्णय

बैठकीसाठी शिरूर पो स्टे अंतर्गत गावातील पोलीस पाटील व शिरूर शहरातील अनेक लोक उपस्थित

0 0 8 2 3 4

सार्वजनिक गणेशोत्सव 2026 साठी शिरूर पोलिसांच्या महत्वाच्या सूचना : बैठक संपन्न
——–
सार्वजनिक गणेशोत्सव 2026 च्या पार्श्वभूमीवर, शिरूर पोलीस स्टेशनने नवीन शिरूर पोलीस स्टेशन इमारतीत, बुधवार दि. 2 सप्टेंबर 2026 रोजी बैठक आयोजित केलेली होती. त्यासाठी शिरूर पो स्टे अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांतील पोलीस पाटील, नागरिक, तसेच शिरूर शहरातील सर्व गणेश मंडळे, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते. मात्र शिरूर पो स्टे च्या नवीन इमारतीमध्ये असणाऱ्या छोट्या सभागृहात उपस्थितांना जागा न पुरल्याने, शिरूर नगर परिषदेच्या नवीन इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील सभागृहात बैठक व्यवस्था ऐनवेळी करावी लागल्याने सर्वांची धावपळ व तारांबळ झाली.
ही बैठक दरवर्षी तहसील कचेरीच्या तिसऱ्या मजल्यावरील मोठ्या सभागृहात होत असते. मात्र जुन्या जागेतील पोलीस स्टेशन नवीन जागेत आल्याने व तेथील सभागृहाची बैठक व्यवस्था अत्यंत कमी असल्याने, या इमारतीच्या वर एखादा मोठा हॉल असणे गरजेचे असल्याची शिरूरकरांमध्ये चर्चा होती.

शिरूर नगर परिषदेच्या प्रकाश रसिकलाल धारीवाल सभागृहात झालेल्या बैठकीचे प्रास्ताविक, शिरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी शासनाने दिलेले अनेक जाचक नियम व सांगितल्याने व यंदा गणपती उत्सवावर मी स्वतः बारीक लक्ष ठेऊन असून, नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितल्याने, सभागृहात जमलेल्या सुमारे 100 कार्यकर्त्यांपैकी एकही जण सूचना मांडायला तयार नसल्याने, सभागृहात काही काळ शांतता पसरल्याचे दिसले. मात्र मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी या गंभीर झालेल्या वातावरणात बदल करण्यासाठी माईक हातात घेत, गणपती बाप्पा मोरया चा जयघोष करत तरुणांना मनमोकळे बोलण्याच्या सूचना दिल्याने वातावरण काही प्रमाणात हलके फुलके बनले.

पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी यावेळी सांगितले की, “मानाचा गणपती असणाऱ्या सुभाष चौक गणपती मंडळाने विसर्जन मिरवणूक ही एकतर सुरुवातीला काढावी किंवा शेवटी काढावी, संपूर्ण मिरवणुकीत डी जे बंदी आहे त्यामुळे कुणीही डी जे लावू नयेत आणि जे बेंजो लावतील त्यांनी आवाजाची मर्यादा पाळावी, तसेच दादा, भाई चे बॅनर लावू नयेत किंवा तशी भडकून देणारी गाणी लावू नयेत.”

अंनिस च्या डॉ वैशाली साखरे यांनी सूचना मांडताना सांगितले की, “डी जे च्या मोठ्या आवाजाने लोकांना त्रास होतो. काही हृदय विकाराच्या लोकांना तर दवाखान्यात जाण्याची वेळ येते. त्यामुळे मिरवणूकीत मोबाईल अंब्युलन्स ठेवावी व शक्यतो डी जे किंवा तत्सम मोठ्या आवाजाची वाद्यच लावण्याची परवानगी नसावी.”

अभिजित आंबेकर यांनी सूचना मांडली की, “आवाजाची मर्यादा ओलांडून तासन तास एकाच ठिकाणी मिरवणूक थांबते व त्यामुळे मिरवणूक मार्गात घरे असणाऱ्या नागरिकांना खूप त्रास होतो. त्यामुळे आवाजावर नियंत्रण असावे.”

रामलिंग येथील एका तरुण कार्यकर्त्याने सूचना मांडली की, “रामलिंग व परिसरातील गणपती हे प्रशासनाच्या सूचनेनुसार, मुख्य विसर्जन मिरवणूकीच्या आदल्या दिवशी विसर्जित होतात. मात्र रामलिंग रोडवर वाहनांमुळे ट्राफिक जामची समस्या निर्माण होते, त्यामुळे तेथील मिरवणुकीवेळी बगाड रोड तात्पुरता सुरु करावा.”

एका मंडळाचे तरुण कार्यकर्ते राजेश गोपाळ यांनी सूचना मांडली की, “विसर्जन मिरवणूकीवेळी मुख्य बाजारपेठेत व विशेषतः हलवाई चौकात, सर्व मंडळाना सारखा वेळ मिळत नाही. कारण पुढची मंडळे जास्त वेळ थांबल्याने आमच्या अनेक मंडळावर अन्याय होतो. आम्हा बऱ्याच मंडळाना 12 वाजल्यानंतर वेळ संपल्यावर मुक्याने जावे लागते. त्यामुळे पुढच्या मंडळाना वेळेत पुढे काढण्याची व्यवस्था पोलीस प्रशासनाने करावी.”

आम्ही शिरूरकर फॉउंडेशनचे रविंद्र सानप यांनी मनोगतात सांगितले की, “आजची मिटिंग ही एक दोन महिने आधीच घ्यायला हवी होती. आत्ता ज्या सूचना पोलीस निरीक्षकांनी दिल्या, त्या सूचना एक दोन महिन्यांपूर्वीच द्यायला हव्या होत्या. कारण आत्ता जवळ जवळ सर्व मंडळानी बेंजो बुक केलेत. त्यामुळे जास्त कडक नियम ठेवल्यास मंडळाचे पैसे वायाला जातील, याकडेही पाहणे गरजेचे आहे.
आता काही दिवसांपूर्वी झालेल्या मुहम्मद पैगंबर जयंतीच्या मिरवणुकीत डीजे लावला गेला होता. त्याच्या मोठ्या आवाजामुळे मुंबई बाजारातील एका उंच घराच्या खिडकीची काच निखळली, सुदैवाने ती खाली पूर्णपणे पडली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यामुळे डी जे बंदी असावीच आणि बाकी बेंजोच्या आवाजावरही नियंत्रण असावे. त्यापेक्षा
पर्यावरण पूरक गणपती, वृक्षारोपण ई. राबवावे. आमच्या “आम्ही शिरूरकर फौंडेशन” च्या वतीने, मिरवणूक बंदोबस्तासाठी ड्युटीवर असणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना, होमगार्ड्सला ड्युटीच्या ठिकाणीच जेवणाचे पॅकिंग पोचविण्याची सोय करत असतो, आणि याही वर्षी तशी सोय करणार आहोत.”

मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी सामाजिक कार्यकर्त्या स्वर्गीय शोभनाताई पाचंगे यांची आजच्या बैठकीला कमतरता जाणवत असल्याची आठवण करत, “त्या सर्व सार्वजनिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी असायच्या, त्यांचे नुकतेच दुःखद निधन झाले, त्यांची आज कमतरता जाणवते, मात्र त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वांनी उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्याची सूचना मांडली. तसेच गणपती उत्सवाबाबत काही सूचनाही मांडल्या.

बांधकाम समितीचे सभापती सुनील जाधव यांनी सूचना मांडली की,
“विसर्जन मिरवणूक मार्गावर बेंजो वाजवला जातो. मात्र कुंभार आळीतून पुढे मुक्याने गणपती जातात, त्यामुळे पुढे नदीपर्यंत किमान ढोल ताशाची तरी परवानगी द्यावी.”

शिरूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी उत्तर देताना सांगितले की, “दरवर्षी प्रमाणे घरगुती गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची सोय केलेली आहे. तसेच नदीकाठी शनी मंदिर परिसरातही गणपती विसर्जन करण्याची सोय केलेली आहे. तेथे निर्माल्य जमा करण्याचीही सोय केलेली आहे. नदीमध्ये ते टाकू नये. काही सूचना असतील तर नक्की नगर परिषदेशी संपर्क साधावा.”

बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांनी सर्वांच्या प्रश्नांवर उत्तर देताना संगितले की, “गणपती विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी केली जाईल, उपस्थितांच्या सर्व सूचनांचे स्वागत आहे, आणि त्या सुचनांवर कार्यवाही केली जाईल. सर्व मंडळामधून उत्कृष्ठ पर्यावरण पूरक मंडळ पुरस्कार, शिरूर नगरपरिषदेकडून दिला जाणार आहे. ”

प्रा सतीश धुमाळ, मुकुंद ढोबळे, दर्शन दरेकर यांसह अनेकांनी सूचना मांडत चर्चेत सहभाग घेतला. तसेच शेवटी शिरूर नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ व सुंदर शिरूर राहण्यासाठी पर्यावरणपूरक गणपती, विसर्जन व निर्माल्य यावर डॉक्युमेंट्री सादर करण्यात आली.
आभार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत दिवटे यांनी मानले.

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0;
runfunc: 0; algolist: 0;
multi-frame: 1;
brp_mask:8;
brp_del_th:0.0038,0.0003;
brp_del_sen:0.1000,0.1000;
motionR: 0;
delta:1;
bokeh:1;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2621440;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 258.10046;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 33;zeissColor: bright;
5/5 - (1 vote)

खुडेज टुडेज न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 8 2 3 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे